संसद श्रेष्ठ म्हणूनच जनता सर्वश्रेष्ठ
भाग1-भाऊ तोरसेकर
कायदे संसदेत बनवले जातात रस्त्यावर नाही. कारण जनतेने लोकप्रतिनिधी निवडले आहेत आणि त्यापासून बनणार्या संसदेला कायदे बनवण्याचा अधिकार दिला आहे. त्या संसदेवर अण्णा किंवा कुठल्या संसदेने आंदोलनाच्या माध्यमातून दडपण आणने हा अतिरेक आहे. तो नैतिक दहशतवाद आहे. देशात राज्यघटना आहे आणि घटनेपेक्षा कोणी मोठा नाही. संसदेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही या सारखे अनेक घटनात्मक आक्षेप अण्णांच्या आंदोलनाच्या विरुद्ध घेतले जात आहेत. एकाहून एक कायेद पंडित, बुद्धीवंत अण्णांच्या आंदोलनाला घटनाबाह्य किंवा लोकशाहीला बाधक ठरवण्यासाठी आपली अक्कलपणाला लावत आहेत. यांचे एकमेव कारण तमाम प्रसार माध्यमे यांच्याच हाती असून, त्यावर एका ठराविक भूमिकेला चिटकून बोलणारे किंवा लिहिणारेच आणले जातात. लोकांसमोर दुसरी बाजू समर्थपणे येऊच नये, याची पूर्णपणे काळजी घेतली जात असते. यात नवे काहीच नाही. एकाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला लक्ष करायचे असेल मग माध्यमे नेहमीच असे वागतात. यालाच गोबल्स्तंत्र म्हणतात.
हिटलरच्या प्रचारमंत्री गोबल्स म्हणायचा, सातत्याने आणि ठामपणे असत्य सांगतच राहिले तर तेच लोकांना हळूहळू खरे वाटू लागते. त्याचाच अवलंब आपल्याकडे प्रस्थापित व्यवस्थेचे अभंग अंग बनलेल्या माध्यमांकडून होत आहे. आरंभीच्या काळात गंमत म्हणून ामध्यमांनी अण्णांना प्रसिद्धी दिली. तेव्हा अण्णा हे स्वयंभू नेतृत्व म्हणून पुढे येईल व जनमान्यता त्यांना मिळेल. ही अपेक्षा माध्यमांनी बाळगली नव्हती. कारण जनतेला अशा एका निस्पृह निरागस नेतृत्वाची आस लागली आहे. याचा थांगपत्ता माध्यमांना नव्हता त्यामुळेच गंमत म्हणून त्यांनी अण्णांना जनतेसमोर पेश केले. तो चेहरा ते व्यक्तीमत्व लोकांना इतके भावले की माध्यमांनी दिलेला आधार काढून घेतल्यावरही अण्णांची प्रतिमा जशीच्या तशी उभीच राहिली. तेवढेच नाही ती सामान्य भारतीयांच्या मनात घर करून बसली आणि आता अण्णा हजारेंनाही माध्यमांची व्यवहारिक गरज होवून बसली. कारण प्रेक्षक व वाचक मिळवायचा तर त्याच्या आवडीनिवडी समोर माध्यमांना झुकणे भाग असते. म्हणून तर सातत्याने राहुल गांधींना थेट दाखवणार्या कॅमेरांना युवराजांची दखल घेऊन अण्णांच्या मागे फरफटण्याची पाळी आली आहे. मग भले अण्णांची निंदा करत का होईना अण्णांचे थेट प्रक्षेपण करावेच लागते आहे.
रविवारी जंतरमंतरने थेट प्रक्षेपण चालू असताना मोठय़ा आग्रहाने प्रत्येक वाहिनीवर जनलोकपालचा आग्रह म्हणजे संसदेवर कुरघोडी असल्याचे सांगितले जात होते. संसद म्हणून पर्यायाने संसदेच्या सदस्य असलेल्या खासदार सर्वश्रेष्ठ असे ठासून सांगितले जात होते. एकदा मतदाराने आपला प्रतिनिधी निवडला मग मतदाराचा म्हणजे पर्यायाने जनतेचा अधिकार संपला, निवडून आला त्याने वाट्टेल तसे वागायचे त्याचा कुणी जाब कुणी विचारू नये, त्याच्याकडे कसली मागणी करू नये, अशी लोकशाहीची व्याख्या आहे का? त्याला जहागिरदारी, सरंजामशाही म्हणतात. पूर्वी पिढीजात ती सरंजामशाही चालायचे, जन्मजात असायचे, आता तिला मतदानातून पाच वर्षाच्या मुदतीसाठी जीवदान दिले जाते. तीच लोकशाही म्हणायची काय? आणि ही असलीच लोकशाही मानायची असेल तर राष्ट्रपती पदाला तोच निकष लादायला नको काय?
आपण सामान्य माणसे मतदार म्हणून प्रत्येक पाच वर्षानी आमदार-खासदार असे प्रतिनिधी निवडतो. ते पुढे राष्ट्रपती पदासाठीचे मतदार असतात. त्यांच्याच मतदानाने राष्ट्रपतीची निवड होते. त्याच राष्ट्रपतींच्या नावाने देशाचा संपूर्ण कारभार चालतो. पण त्याचे अधिकार काय? निमूटपणे पंतप्रधान वा मंत्रिमंडळाने पाठवलेल्या कागदावर सह्या करणे. कारभार त्याच्या नावाने चालणार पण त्यातली कुठलीही गोष्ट ठरवायचा अधिकार त्या राष्ट्रपतीला नसतो. अफजल गुरूने राष्ट्रपतींकडे माफीसाठी अर्ज केला आहे. त्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय होत नाही म्हणून तो धूळखात पडलेला आहे. म्हणजेच मतांची निवडून आलेल्या राष्ट्रपतीला त्याच्याच नावे राज्य चालले असताना अधिकार नाही. मग तुमच्या आमच्या मताने संसद सदस्य, झालेल्यांचा अधिकार आपल्या पेक्षा मागे कसा? ज्या राष्ट्रपतीला निवडले त्याने त्याचेच मतदार ठरवतील त्यावर निमूट सही करायची तर मग त्याच संसद सदस्याचे मतदार ठरवतील त्याप्रमाणे त्याने संसदेत वागायला नको काय? संसदेला सभासद म्हणजे खासदार तुमचा आमचा प्रतिनिधी आहे तर तो पक्षश्रेष्ठींच्या हक्काचा ताबेदार कशाला असतो?
एका राज्यतल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर जे उमेदवार निवडून येतात, त्यांनीच आपला नेता मुख्यमंत्री म्हणून निवडायचा असतो. बहुमत मिळवणार्या कॉंग्रेस पक्षाचे आमदार नेहमी तो अधिकार आपल्या पक्षाध्यक्षालाच दिल्याचा प्रस्ताव करतात. मग सोनिया गांधी (पूर्वी इंदिराजी किंवा राजीव गांधी) मुख्यमंत्री ठरवतात. ही कुठल्या राज्यघटनेतली तरतूद आहे? सकाळी दिल्लीच्या पत्रकारापुढे राजीनामा देणार नाही म्हणणारे अशोक चव्हाण संध्याकाळी सोनिया भेटी नंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतात ती कुठली घटनात्मक लोकशाही असते? या प्रकारे चालणारी लोकशाही सोनियाच्या नावावर नाचणारी असते. म्हणजे कायदे मंडळावर किंवा संसदेवर सोनिया कुरघोडी करतात, त्याचे कुणाला वावडे नाही, मग अण्णा किंवा अण्णांच्या सहकार्यांनी संसदेवर एखाद्या कायद्यासाठी दबाव आणण्याल लोकशाही का धोक्यात येते?
2005 सालात विलासराव देशमुखांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पायउतार व्हावे लागलेले होते. त्यानंतर बोललेले त्यांचेच विधान त्यांना आठवले का? आपल्याला काय बाजूला केले ते कळलेच नाही, असे विलासराव सत्ताधारी आघाडीतील आमदारांचा विश्वास होता. पर्यायाने महाराष्ट्राच्या जनतेचाही विश्वास होता. पण महाराष्ट्रातल्या मतदारही नसलेल्या सोनिया गांधींच्या मर्जीतून विलासराव उतरले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. हा सगळा प्रकार कोणत्या घटनात्मक लोकशाहीमध्ये बसणार असतो? अर्थात हे सर्व मला आठवते व नेमके सांगताही येते, तेव्हा माझ्याहून अधिक शहाणे आणि अभ्यासक असलेल्या राजकीय जाणकार संपादकांनाही सर्व आठवत असणार मग ते सांगत का नाहीत? त्यांना सोनिया-राहुल यांचा घटनात्मक हस्तक्षेप का सांगता येत नाही? तर सांगायचा नसतो. उलट लपवायचा असतो. अण्णांना खलनायक बनवायचे तर सोनिया-राहुल यांनी केलेले घटनाबाह्य हस्तक्षेप कसे सांगता येईल? मग तो पायंडा ठरेल आणि अण्णांच्या आंदोलन गैर लागू म्हणायला जागा उरणार नाही ना?ए राजा यांना हाकलायचे होते. पण हाकलता आले नाही, अशी लाचार कबुली पंतप्रधानांनी संपादकांशी केलेल्या संवादातून दिलेली आहे. तेव्हा त्यांच्यासहीत सिब्बल, सिंघवी इत्यादी घटनातज्ज्ञांना संसदीय लोकशाहीची महानता का आठवली नव्हती. ज्या कारणास्तव अण्णांना घटनाविरोधी म्हटले जात आहे त्याच कारणास्तव मनमोहन सिंग देखील खलनायकच ठरतात ना? तेव्हा संसदेच्या थोरवी किंवा पाविर्त्याच्या गप्पा सर्व थोतांड आहे. शहाबानूच्या खटल्यातील पोटगीचा सुप्रिम कोर्टाचा निर्णय फिरवायला देशभरातल्या मुस्लिम पक्षसंघटनाने दबाव आणला व राजू गांधी याच्या समोर झुकले. तेव्हा हे तमाम घटनात्मक लोकशाही रक्षक कुठल्या बिळात लपून बसले होते. तांदळातला खडा काढून दाखवायचा आणि पोत्यातल्या सर्व मालालाच खडे ठरवायचे तशीच ही शुद्ध बदमाशी नाही काय? जोवर संसद जनभावनेचे प्रतिबिंब असल्याप्रमाणे वागते तोवर ती लोकशाहीने सर्वश्रेष्ठ असते. कारण जनताच खरी सर्वश्रेष्ठ असते. संसद जनतेचे प्रतिबिंब असते